‘हात जोडतो…’ मोदी सरकारची नाचक्की रोखण्यासाठी देवगौडांची विरोधकांपुढे याचना

संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज नीट यूजी परीक्षा घोटाळ्याचे तीव्र पडसाद उमटले. लोकसभेत विरोधकांनी जोरदार हंगामा केला आणि कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे राज्यसभेतही विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. याच पार्श्वभूमीवर सरकारची नाचक्की रोखण्यासाठी खासदार एच. डी. देवगौडा यांनी राज्यसभेत विरोधकांना ‘हात जोडतो…’ असे म्हणत कळकळीची विनंती केली.

राज्यसभेत बोलताना देवगौडा म्हणाले की, नीट युजी परीक्षेत चुकीचं घडलंय हे आम्हाला मान्य आहे. त्या दृष्टीने सरकारने चौकशी आणि कारवाईसाठी योग्य प्रकारे निर्णय घेतला आहे. कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण कुणालाही जबाबदार धरू शकत नाही. त्यामुळे तूर्तास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारची प्रतिमा खराब करू नये, अशी विनवणी देवगौडा यांनी केली आहे.

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या घोटाळ्याला मोदी सरकारही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. त्याचेच पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले.