
पेणमधील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर बॅगेत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असतानाच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत आठ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाताचे कोठार यासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्याची ओळख आता बेवारस मृतदेहांचे डम्पिंग अशी होऊ लागली आहे. कोणताही पुरावा नसल्याने या मृतदेहांची ओळख पटवताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरीकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात सात ते आठ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत पोलिसांसमोर ठिकठिकाणी सापडणाऱ्या बेवारस मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास काही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 1 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत जिल्ह्यात आठ बेवारस मृतदेह सापडले आहेत. विशेष म्हणजे सापडलेल्या आठ बेवारस मृतदेहांपैकी चार मृतदेह पेण तालुक्यात सापडले, तर महाड, मुरुड, खालापूर, अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह सापडला आहे.
डोक्याला ताप
2012 मध्ये शीना बोरा हत्याकांड घडले होते. शीनाचा मृतदेह तीन वर्षांनी पेण तालुक्यात आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यात सापडणाऱ्या बेवारस मृतदेहांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जनस्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवताना पोलिसांच्या डोक्याला ताप झाला आहे.