तंत्रज्ञानानंतरही विक्रम दूरवरच!

>> द्वारकानाथ संझगिरी

फ्रान्सच्या एका द्रष्टय़ा तरुण मुलाने काळाच्या उदरात गाडलेलं ऑलिम्पिक बाहेर काढलं.

त्याचं नाव कुबर्तिन. त्याने म्हटलं होतं, ‘ऑलिम्पिकमध्ये जिंकणं नाही, तर भाग घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे.’
त्याचं हे वाक्य हिंदुस्थानने अत्यंत गंभीरपणे घेतलेलं आहे. याचा प्रत्यय आपल्याला दर ऑलिम्पिकमध्ये येतो. या वर्षी 117 खेळाडू आपण घेऊन गेलो आणि पाच कांस्य आणि एक रौप्यपदक घेऊन परत आलो.

कुबर्तिन बोलला त्याला सव्वाशेपेक्षा जास्त वर्षं उलटून गेली, पण हिंदुस्थानने त्याचे सुभाषितवजा वाक्य खाली पडू दिलं नाही.

असं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य ऑलिम्पिक आलं की वाचायला मिळतं. ते म्हणजे ‘फास्टर, हायर अॅण्ड स्ट्राँगर’. ऑलिम्पिकचं हे ध्येय आहे आणि जग या ध्येयाच्या दिशेने नेहमीच कूच करताना दिसते.

या ऑलिम्पिक स्पर्धेचं आपण उदाहरण घेऊया. या ऑलिम्पिकमध्ये जवळपास 18 जागतिक विक्रम मोडले गेले. काही विक्रम मोडले गेले नाहीत; पण तरीसुद्धा ऑलिम्पिकचे ध्येय पुढे चालले आहे हे जाणवतं. एक सुंदर उदाहरण म्हणजे भालाफेक. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने आपल्याला त्यात गेल्या वेळी सुवर्णपदक मिळवून दिलं. या वर्षी त्याला रौप्यपदक मिळालं; पण गंमत बघा, गेल्या वेळी जितक्या दूरवर त्याने भालाफेक केली होती आणि त्याला सुवर्णपदक मिळालं होतं, त्यापेक्षा जास्त दूर भालाफेक करूनसुद्धा यावेळी त्याला सुवर्णपदक मिळालं नाही. त्याला रौप्यपदकावर समाधान मानायला लागलं. गेल्या वेळी त्याने 87.58 मीटर्स इतक्या अंतरावर भाला फेकला होता. यावेळी 89.45 मीटर या अंतरापर्यंत त्याने भाला फेकला आणि तरीही हाती लागलं ते रौप्यपदक. कारण पाकिस्तानच्या नदीमने 92.97 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला, पण तरीसुद्धा हा विश्वविक्रम नाही. विश्वविक्रम आहे 98.48 मीटर. म्हणजे अजून केवढं अंतर गाठायचं आहे हे लक्षात येईल.

मग डोक्यात प्रश्न असा येतो की, हे विक्रम असे किती दूर दूर जाणार किंवा काही खेळांच्या बाबतीत कमी होणार? शेवटी मानवी ताकदीला मर्यादा तर आहेच. आज मानव त्या मर्यादा ओलांडत आहेत. त्यासाठी विविध कारणं आहेत.

1) क्रीडा विज्ञान सातत्याने पुढे जात राहतंय. 2) खेळाची आयुधं बदलत चालली आहेत. मग ट्रक असो, घालायचे शूज असो, कपडे असो किंवा भाला… अशा अनेक गोष्टी आहेत. 3) ट्रेनिंगमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. 4) ट्रेनिंगसाठी आणि सरावासाठी मिळणाऱया विविध सुविधा प्रचंड प्रमाणात सुधारल्या आहेत. 5) स्पर्धा फार मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. चोप्राला गेल्या वेळी सुवर्णपदक मिळाले होते. त्या अंतरावर
भाला फेकणारा यावेळी सातव्या क्रमांकावर आला. 6) ऑलिम्पिक आहे ते शहर कसे आहे? समुद्रसपाटीवर आहे की उंचावर आहे, उंचावर वाऱयाचा वेग काय आहे यावरही बरंच अवलंबून असते. एक गंमत सांगतो, 1968 साली मेक्सिकोला बॉब बिमने 8.90 मीटर एवढी लांब उडी मारली. तो स्वतःसुद्धा ती उडी पाहून आश्चर्यचकित झाला. हा विक्रम बराच काळ अबाधित राहिला. तो माईक पॉवेलने 1991 साली मोडला आणि अजून तो अबाधित आहे.

ट्रक आणि आणि पोहण्याच्या शर्यतीत तर आणखीन धमाल आहे. कारण तिथे नवीन तंत्रज्ञानाने एका सेपंदाचे हजार भाग करतात. सेपंदाच्या हजार भागामुळेसुद्धा विक्रम होऊ शकतो. पण हे तंत्रज्ञान कितीही अजूनही प्रगत झालं तरीही कुठेतरी माणसाच्या शरीराला मर्यादा ही असणार. त्यामुळे काही विक्रम हे खूप काळ गोठवून टाकल्यासारखे वाटतात. त्याचं सगळय़ात उत्तम उदाहरण म्हणजे महिलांची 100 मीटरची शर्यत. अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रीफिथ जॉइनरने जुलै 1988 मध्ये शंभर मीटरचा प्रवास 10.49 सेपंदांत केला. हा विक्रम अजूनही मोडला गेलेला नाही.

याचा अर्थ तिच्याकडे काहीतरी भन्नाट मानवी स्पह्टक ताकद असावी, जी मानवाला आजच्या सगळय़ा तंत्रज्ञानाने दिलेल्या सुविधा घेऊनसुद्धा ओलांडता येत नाही.

सर्वात गंमत आहे ती पुरुषांच्या शंभर मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत. ही शर्यत साधारण 40 पावलांची असते आणि पेंब्रिजच्या एका शास्त्रज्ञाच्या मते सुरुवात लवकर होणं खूप फायद्याचं ठरतं. एखादा खेळाडूं जर सुरुवातीला 0.10 सेपंदांत रिअॅक्ट झाला, तर ते अवैध मानलं जातं. त्या शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की, चॅम्पियन खेळाडू हे 0.12 सेपंदांत रिअॅक्ट होतात, पण उसेन बोल्टसारखा लिजंड पंधरा सेपंदांत होतो. याचा अर्थ त्याला 0.03 सेपंदचा उशीर होतो. बोल्टकडे या शर्यतीतला जागतिक विक्रम आहे. 2009 साली तो ही शर्यत 9.58 सेकंदांत धावला होता. तेव्हा त्याचा रिअॅक्शन टाइम हा 0.15 होता. तो जर रिअॅक्शन टाइम त्याने 0.12 वर आणला तर तो ही शर्यत 9.46 सेकंदांत जिंकू शकला असता; कारण तिथे सेकंदाला दोन मीटर असा वारा वाहत होता. बोल्ट धावायचा त्यावेळी चित्त्यानेसुद्धा त्याच्याकडे काwतुकाने वळून पाहिलं असतं.

दहा-बारा वर्षांपूर्वी मी इंग्लंडमध्ये असताना एक लेख वाचला होता. त्या लेखामध्ये प्राध्यापक जॉन ब्रुवर या खेळाच्या शास्त्रज्ञाचं एक संशोधन दिलं होतं. तो त्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रेड पर्ह्डमध्ये प्राध्यापक होता. तो म्हणतो की, ‘यापुढे विक्रम अत्यंत छोटय़ा मार्जिनने मोडले जातील. कुठलाही अन् मॉडीफाइड मानव शंभर मीटरचं अंतर आठ सेपंदांत किंवा मॅरेथॉन 90 मिनिटांत धावणार नाही. महिलांचे विक्रम जास्त वेगात तुटू शकतील. कारण आता महिलांचा सहभाग ऑलिम्पिकमध्ये खूप वाढलाय.’ यावेळी पॅरिसमध्ये 50 टक्के महिला खेळाडू होत्या. काही वर्षांपूर्वी स्टॅनपर्ह्ड विद्यापीठात मानव आणि जनावर यांच्या शर्यतीच्या बाबतीत तुलना केली गेली होती. कारण माणसांप्रमाणेच कुत्रे आणि घोडे यांच्याही शर्यती असतात. त्यांच्या असं लक्षात आलं की, सत्तरीच्या दशकानंतरचे कुत्रे विशेषतः ग्रे हाऊंड जमातीचे आणि घोडे त्यांचे विक्रम गोठवले गेले आहेत, पण मानव मात्र पूर्वीपेक्षा जास्त वेगात धावतो. त्या अभ्यासाच्या दृष्टीने शंभर मीटरची शर्यत ही मानव कमीत कमी 9.48 सेपंदांत जिंकू शकतो. पण 100 मीटरच्या शर्यतीत 9.50 सेपंदांची भिंत पार करण्यासाठी 100 वर्षे लागतील. पण प्राध्यापक ब्रुवर एका बाबतीत आशावादी आहेत. त्यांना असं वाटतं की, मानव मॅरेथॉन नक्की दोन तासांच्या आत धावू शकतो, अगदी काही वर्षांत.

आज मॅरेथॉनचा जागतिक विक्रम 2 तास 35 सेपंद आहे. त्यामुळे तो सत्याच्या जवळ आहे. हे गणित फक्त बदलू कधी शकेल… तर उद्या जेनेटिक डोपिंग झालं तर. काही प्राण्यांमध्ये स्नायूंची ताकद आणि स्टॅमिना हे जेनेटिक डोपिंगने वाढवण्याचा प्रयोग झाला. तो जर मानवावर झाला तर मग रेकॉर्डला अंतच राहणार नाही. अर्थात हे सगळे असेल तरी हिंदुस्थानसाठी नाही. कांस्यपदक ही हिंदुस्थानात मिरवणूक काढण्याएवढी मोठेपणाची गोष्ट ठरते. आधुनिक देशात कांस्यपदक हे रात्र दुःखात तळमळत काढण्याची गोष्ट आहे. आपण अजून पदकांच्या बाबतीत दारिद्रय़रेषेखाली आहोत. पण तरीही ऑलिम्पिक पाहताना या काही गोष्टी वाचल्या त्या तुमच्यासमोर मांडल्या.