वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मार्गी लागलेले नाही. रस्त्यावर टाकलेली खडीदेखील वाहून गेल्याने रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी शिमगा करून सरकारचा निषेध केला. रस्त्यावर टाकलेली खडी वर येऊन व पडलेल्या खड्डय़ांमुळे लहान-मोठे अपघात होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोंब मारत रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या अर्धवट कामाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आप्पासाहेब भालसिंग, लक्ष्मणराव गोरे, राधुजी म्हस्के, श्रीधर बोठे, युवा कार्यकर्ते कदम, कांडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्षभरापूर्वी साधारण 4 कि.मी. पर्यंतच्या वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याचे काम मार्गी लावून उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी ठेकेदाराने फक्त दगड व खडी टाकली. मात्र, वर्ष उलटून गेले तरी त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. पावसामुळे टाकलेली खडीदेखील वाहून गेल्याने लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांना खडी व खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. अनेक शाळकरी मुले पडून जखमी झाले असून, टोकदार खडीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याच्या घटना वाढत आहेत. या रस्त्यामुळे नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी शिमगा करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेल्या वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. टाकलेली खडी वाहून गेल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, प्रशासनाने तातडीने अर्धवट सोडून दिलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावावे.
– विजय भालसिंग, सामाजिक कार्यकर्ते, वाळकी