
गुन्हा दाखल होऊनही दीड महिन्यापासून मुलगी बेपत्ता असून, पोलिसांना तपास लागत नसल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीने टोकाचे पाऊल उचलत तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्यातच स्वतः पेट्रोल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. अंबाजोगाई तालुक्यातील बारावीच्या वर्गात शिकत असलेली ऋतुजा व्यंकट माने ही अल्पवयीन मुलगी 5 फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव येथे तिच्या मामाच्या मुलीसोबत प्रात्यक्षिक परीक्षेला गेली होती. त्यावेळी तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ हरिभाऊ काळे आणि आत्या मीरा हरिभाऊ काळे यांनी तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ काळे आणि मीरा काळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चेन्नाशेट्टी हे तपास करीत होते. या घटनेला दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही मुलीचा तपास लागलेला नाही म्हणून 20 मार्च रोजी मुलीची आई योगेश्वरी माने हिने दुपारी एक वाजेच्या सुमारास युसूफवडगाव पोलीस ठाण्यासमोर स्वतŠ अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र, तिचा आरडाओरडा ऐकून पोलीस निरीक्षक राहुल पतंगे, पोलीस उपनिरीक्षक बसवराज चेन्नाशेट्टी आणि पोलीस कर्मचाऱयांनी तिला आत्मदहन करण्यापासून रोखल्यामुळे अनर्थ टळला.