
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याची संतापजनक घटना राहुरी येथे घडली. याचे तीव्र पडसाद उमटले असून, हजारो शिवप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले. उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. मनमाड महामार्ग रोखला. दरम्यान, शहरात तणावाचे वातावरण असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उद्या (दि. 27) व्यापारी संघटनांनी ‘राहुरी बंद’ची हाक दिली आहे.
राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात बुवासिंद बाबा तालीम संघ येथे बजरंग बलीची मूर्ती आहे. त्याशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात इसमाने तालमीत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. थोडय़ा वेळाने काही तरुण तालमीत आले असता, त्यांना पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. ही माहिती समजताच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. व्यापाऱ्यांनी तत्काळ दुकाने बंद केली. संतप्त शिवप्रेमी जनतेने राहुरी पोलीस स्टेशनवर धाव घेत माथेफिरू आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी राहुरी नगर परिषदेतील लिपिक हरिश्चंद्र वसंत बिवाल यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
परिसरात प्रचंड तणाव
राहुरी शहरात तणाव वाढला असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, अजिनाथ पाखरे, सतीश कुऱहाडे, राहुल यादव, नदीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. रावसाहेब चाचा तनतुरे, हर्ष तनपुरे, अमोल भनगडे, नंदू तनपुरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
बेमुदत बंदचा इशारा
पोलिसांनी माथेफिरू आरोपीला तातडीने अटक करावी; अन्यथा राहुरी तालुका बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा शिवप्रेमी जनतेने दिला आहे.
वाहनांच्या आठ किमीपर्यंत रांगा
शिवप्रेमी जनता आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दुपारी साडेचार वाजता नगर-मनमाड महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला. हजारो नागरिक या ‘रास्ता रोको’ आंदोलनात सहभागी झाले होते. दोन्ही बाजूंनी आठ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांनी माथेफिरू आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन मागे घेण्यात आले. या ठिकाणी आमदार शिवाजीराव कर्डिले, अरुण तनपुरे, सुरेश बनकर, सत्यजित कदम यांनी भेट दिली.