वर्दीतील डॉक्टरमुळे तरुणाला जीवदान; रस्त्यात फिट आलेल्यावर पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक उपचार

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर फिट आलेल्या तरुणाच्या मदतीला धावून जात पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी तरुणाचे प्राण वाचविले. भाजीभाकरे यांचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा यावेळी फायदा झाला.

मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे कर्तव्यावर चालले असताना, त्यांना वानवडी परिसरातील जगताप चौकात अपघात झाल्याचे दिसले. एका तरुणाने एका आजीला दुचाकीची धडक दिली. यावेळी आजींना रक्तस्त्राव होत असतानाही त्यांना दिसले. त्यांनी त्याच्या खिशातील रूमाल काढून आजींच्या जखमेवर बांधला. मात्र, लागलीच त्यांचे त्या तरुणाकडे लक्ष गेले. तरुणाला फिट आल्यानेच त्याच्याकडून हा अपघात घडल्याचे त्यांना लक्षात आले. फिट आल्यामुळे त्या तरुणाचा जबडा जाम झाला होता. त्यांनी आपले वैद्यकीय कौशल्य वापरून तरुणाला पुन्हा शुद्धीवर आणले. समयसुचकता दाखवून तरुणाचे प्राण वाचविले. त्यानंतर पोलीस दलातील सहकाऱ्यांना बोलावून तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. भाजीभाकरे यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून तसेच विविध सामाजिक माध्यमांतून कौतुक होत आहे.