![AJIT PAWAR](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/03/AJIT-PAWAR1-696x447.jpg)
महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून धुसफुस सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिंधे गटाच्या आमदारांना डावलून रायगड जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक बोलावली. विशेष म्हणजे या बैठकीला अजितदादा गटाच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. बैठकीची कोणतीही पूर्वकल्पना न देता डीपीडीसीची ऑनलाइन बैठक बोलाविण्यात आल्याने मिंधे आमदारांनी थयथयाट सुरू केला आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीत अजित पवार गट आणि शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र शिंदे गटाच्या विरोधामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळालेला नाही. त्यात आज अजितदादा यांनी अदिती तटकरे यांना सोबत घेऊन रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्याने त्यात आता नव्याने वादाची ठिणगी पडली आहे. आमदारांना डावलून डीपीडीची बैठक बोलविल्याने शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून हा अवमान असल्याचे म्हटले आहे.
बैठकीत निश्चितच गौडबंगाल – थोरवे
रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अधिकृत होती तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवायला पाहिजे होते. त्यांनी आम्हाला बोलावले नाही, निश्चितच या बैठकीत काहीतरी गौडबंगाल आहे.
वारंवार अन्याय चुकीचा – दळवी
आम्ही सर्व आमदार रायगडमध्ये असून आम्हाला बैठकीचे निमंत्रण नव्हते. आम्हाला बैठकीची ऑनलाइन लिंकही पाठवण्यात आली नाही आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल तर ते चुकीचे आहे.
रायगडावर असल्याने बैठकीला नव्हतो – गोगावले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून मंत्री भरत गोगावले यांना बैठकीसाठी आमंत्रित केल्याचे स्पष्ट केले. दरम्यान गोगावले यांनी आपण रायगडावर असल्याने बैठकीला पोहोचू शकलो नसल्याचे म्हटले आहे.