मिंधे पुन्हा ‘दऱ्या’खोऱ्यात, उपमुख्यमंत्र्यांची नाराजी उफाळली

निधी वाटप, पालकमंत्रीपदाचा वाद आणि वित्त खात्याकडून फायलींची होणारी अडवणूक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून झालेली कानउघाडणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील महत्त्वही घटल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम गुंडाळले आणि महाबळेश्वरमधील दरे गावी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदे यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. ‘सरकारच्या विमानाचा मी पायलट होतो. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे माझे को-पायलट होते, पण आता देवेंद्र फडणवीस पायलट आणि मी को-पायलट आहे. आमची खुर्ची बदलली,’ असे विधान करीत मुख्यमंत्री पद गेल्याबद्दलची खदखद व्यक्त केली. त्यानंतर शिंदे बुधवारी दुपारी हेलिकॉप्टरने अचानक साताऱ्यातील दरे गावी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आहेत. कोणतेही कारण न देता अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरने मुंबईतून दरे गावी उड्डाण केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा मंत्रालयात सुरू झाली आहे.