
लोकसभेतील लाजिरवाण्या पराभवानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र पराभवाचं खापर भाजपनं मिंधे आणि अजित पवार गटावर फोडलं आणि त्यांना जबाबदारीवर कायम राहण्याचे आदेश दिले. त्यासोबतच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मिंधे आणि अजित पवार गटाला फारसं महत्त्व न देता जागा लढवण्यासंदर्भातील निर्णय अधिकार आपल्याचकडे कसे राहतील असा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं कळतं आहे. याच दरम्यान भाजपने विविध राज्याच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलवून बैठक घेतली. या बैठकीस मुख्यमंत्रीच बोलवण्यात आलेले असताना महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांना बोलवण्यात आलं आणि इतकंच नाही तर त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान देखील देण्यात आला आहे. त्यातून मिंधे आणि अजित पवार गटाला स्पष्ट संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका या आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही स्थिती सध्या तरी दिसत नसल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांना बोलवून भाजपनं मिंधे अजित पवार गटाला एकप्रकारे स्पष्ट संदेश दिल्याचं बोललं जात आहे.
भाजपाने देशातील भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आलं. बैठक मुख्यमंत्र्यांची असताना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फोटोसेशनवेळी पहिल्या रांगेत बसल्याचे दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पहिल्या रांगेत पाहायला मिळाले. सध्या चर्चेत असलेल्या या फोटोत भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. पहिल्या रांगेत नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा आणि विविध राज्यांमधील मुख्यमंत्री दिसत आहेत. याच रांगेत उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस बसल्याचं दिसत आहे.