मुंबईतील 420 पैकी 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सर्वाधिक 20 उमेदवार जोगेश्वरीतील

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 420 पैकी 345 उमेदवार आपले डिपॉझिटही वाचवू शकलेले नाहीत. त्यांना इतकी कमी मते मिळाली की डिपॉझिट म्हणून भरलेले दहा हजार रुपये त्यांना गमवावे लागले आहेत. यात सर्वाधिक 20 उमेदवार हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत.

मुंबईतील 36 मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 420 पैकी फक्त 75 उमेदवारांनी भरघोस मते मिळवली. इतरांना डिपॉझिट वाचवण्यापुरतीही मते मिळवता आली नाहीत. अजित पवार गटाचे मानखुर्द विधानसभेतील उमेदवार नवाब मलिक यांनीही डिपॉझिट गमावले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच खरी लढत झाली. अन्य उमेदवारांकडे मतदारांनी अधिक प्रतिसाद दिलाच नाही. अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या उमेदवारांना मते देण्याऐवजी नोटाचा पर्याय निवडल्याचेही मतदारांनी सांगितले.

जोगेश्वरीत 22 पैकी दोन उमेदवार बचावले

जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघात मुंबईत सर्वाधिक 22 उमेदवार रिंगणात होते. त्यातील फक्त शिवसेनेचे बाळा नर आणि मिंधे गटाच्या मनीषा वायकर हे दोनच उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले आहेत.

पहिल्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनी डिपॉझिट गमावले

मुंबईतील बहुतांश मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्येच लढत झाली. पहिल्या दोन उमेदवारांनाच बहुतांश मते मिळाली. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिसऱया क्रमांकापासून पुढील सर्व उमेदवारांनी डिपॉझिट गमावली आहेत. पहिल्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त सर्वांचीच अनामत रक्कम सर्व मतदारसंघांत जप्त होणार असली तरी माहीम, मानखुर्द, अणुशक्तीनगर या तीन मतदारसंघांत तीन उमेदवारांनी भरघोस मते घेऊन निवडणुकीत चुरस आणली.

निकष काय सांगतो

यंदा विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला दहा हजार रुपये डिपॉझिट भरावे लागले. आरक्षणांतर्गत असलेल्या उमेदवारासाठी पाच हजार रुपये डिपॉझिट होते. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानातील वैध मतांपैकी एक षष्ठमांश म्हणजेच 16.33 टक्के मते उमेदवाराला मिळवावी लागतात, अन्यथा त्याचे डिपॉझिट जप्त केले जाते असा निवडणूक आयोगाचा निकष आहे.