
भाईंदर मधील डोंगरी येथे मेट्रोचे कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यातील काही झाडांचे नियमानुसार पुनर्रोपण करणे सक्तीचे आहे. त्यासाठी आधी 20 कोटी रुपये भरा आणि मगच झाडांना हात लावा, अशा शब्दात मीरा-भाईंदर महापालिकेने एमएमआरडीएला पत्र लिहून ठणकावले आहे. प्रत्यक्ष पैसे जमा झाल्यानंतरच झाडे तोडण्याची परवानगी दिली जाणार आहे.
भाईंदरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरी भागात मेट्रोचे मोठे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी भाईंदर पश्चिमेकडील राधास्वामी सत्संग परिसर आणि मुर्धा ते मोरवा गावादरम्यान असलेल्या मोकळ्या जमिनीवर कारशेडसाठी आरक्षण टाकले होते. मात्र तेथे कारशेड न उभारता डोंगरी येथे उभारले जाणार आहे. तेथील जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित केली असून आता 11 हजार 306 झाडे तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडताना त्यातील अनेक झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल. 574 झाडांचे पुनर्रोपण व नव्याने 8 हजार 292 झाडे लावणे सक्तीचे आहे. मात्र ही झाडे कुठे लावणार याचा सविस्तर आराखडा पाठवा, असे पत्र उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी एमएमआरडीएला लिहिले आहे. या झाडांची एमएमआरडीएकडे जागा नसल्याने प्रति झाड 25 हजार रुपये याप्रमाणे 20 कोटी 73 लाख रुपये पालिकेकडे जमा करण्यासदेखील सांगितले आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर वृक्षांच्या पुनर्रोपणाची प्रक्रिया पार पडणार आहे.