रजा न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्याने तीन सहकर्मचाऱ्यांना चाकूने भोसकले, आरोपीला अटक

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या राजारहाटच्या न्यू टाऊनमध्ये पब्लिक हेल्थ इंजीनिअरिंग विभागात असणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याने सुट्टी न मिळाल्याने आपल्या तीन सहकाऱ्यांना चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तीन सहकाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

अमित कुमार असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.अमितने रजेसाठी अर्ज केला होता, मात्र तिथून त्याच्या आणि त्याच्या वडिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या. याचा त्याला प्रचंड राग आला आणि त्याने हल्ला केल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले.सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही घटना न्यू टाऊन टेक्निकल एज्युकेशन बिल्डिंग जवळ गुरुवारी दुपारी घडली. रजा न मिळाल्याने आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तो संतापला आणि तो तसाच ऑफिसमधून बाहेर पडला. दरम्यान, समोरून येणाऱ्या त्याच्या तीन सहकाऱ्यांनी त्याला त्याच्या रागाचे कारण विचारले. यामुळे तो आणखी संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या तिन्ही सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला.

या घटनेनंतर तो हातात चाकू घेऊन रस्त्यावर फिरताना दिसला. माहिती मिळताच घटनास्थळाजवळ कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. आरोपीला चाकू फेकण्यास सांगण्यात आले. यानंतरही त्याने काही वेळ हातात चाकू ठेवला आणि नंतर तो फेकून दिला. त्यानंतर टेक्नो सिटी पोलिसांनी त्याला अटक केली.