Satara News : सावधान! साताऱ्यात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट

स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या तालावर, राज्यकर्ते ‘इलेक्शन मोडवर’ आणि मच्छरांसह जीवजंतू ‘ऍक्शन मोडवर’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्यामुळे सामान्य माणूस डेंग्यू, मलेरियाने फणफणला आहे. सातारा जिह्यात अद्यापि ‘झिका’चा वरवंटा फिरला नसला, तरी डेंग्यूचा विळखा वाढत चालल्यामुळे लोक डासांच्या दहशतीखाली वावरत आहेत.

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सातारा जिह्यात जिल्हा परिषदेबरोबरच नगरपालिका आणि कित्येक ग्रामपंचायतींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रशासकांचीच सत्ता चालत आहे. त्यावर जनतेतून निवडून जाणाऱया प्रतिनिधींचे नियंत्रण राहिले नसल्यामुळे आणि ‘माजी’ झालेल्या पदाधिकाऱयांचे ऐकण्याचे बंधन नसल्यामुळे त्यांच्याच तालावर कारभार चालत आहे. परिणामी, सध्या सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाचे संकट निर्माण झाले असताना प्रभावी उपाययोजना होताना दिसत नसल्याची तक्रार आहे.

एकीकडे प्रशासकराज आणि दुसरीकडे ‘इलेक्शन मोडवर’ असलेले राज्यकर्ते या दोघांचेही प्राधान्यक्रमाचे विषय वेगवेगळे असल्यामुळे सामान्य माणूस डेंग्यू, मलेरियासारख्या तापाने फणफणला आहे. सरकारी, खासगी दवाखाने डेंग्यूच्या रुग्णांनी ‘फुल्ल’ झाल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल डेंग्यूच्या रुग्णांच्या आकडेवारीतून जिह्यात डेंग्यूने थैमान घातल्याचे चित्र आहे. आकडेवारीनुसार सरकारी दवाखान्यात कोरेगाव तालुक्यात 17, वाईत 14, खंडाळा तालुक्यात 12, खटाव तालुक्यात 9, जावली तालुक्यात 5 याप्रमाणे डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. अन्य तालुक्यांमध्येही काही प्रमाणात रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ही केवळ सरकारी दवाखान्यांतील आकडेवारी आहे. जिल्हाभर खासगी रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. जिह्यात अद्यापि ‘झिका’ने हातपाय पसरले नसले, तरी डेंग्यूने जिल्हावासीयांची झोप उडविली आहे.