>> प्रेमसागर मेस्त्री
दक्षिण रशिया आणि पूर्व आशिया खंडातून थेट भारतात स्थलांतर करणारा कांड्या करकोचा हा पक्षी. त्यांच्या सर्वेक्षणासाठी गुजरात छोटा रण ऑफ कच्छ, भुज, ग्रेटर रण ऑफ कच्छ उत्तर प्रदेश आदी भागांत प्रवास करताना खिचान गावापाशी पोहोचलो. इथे जैन धर्मीय आणि इतर गावकऱ्यांनी या पक्ष्यांना खाद्य देण्याची व्यवस्था केली. या गावात न चुकता हे पक्षी थेट प्रवास करतात.
कांड्या करकोचा (डेमौझिल क्रेन्स) प्रजातीचे पक्षी दक्षिण रशिया आणि पूर्व आशिया खंडातून थेट भारतात स्थलांतर करतात. मोरक्को स्पेन ते रशिया पूर्व अशा आडव्या पट्टय़ात जवळपास 47 देशांमध्ये डेमोझिल क्रेन्सचे वास्तव्य आहे. हिमालयाची उंचच उंच पर्वतरांग ओलांडून उत्तर प्रदेश ते राजस्थान, गुजरात असा ते प्रवास करतात. येथील त्यांचे मोठे थांबे, पाणथळीच्या जागा या निश्चित ठरलेल्या आहेत. बऱयापैकी सगळ्यांचे स्थलांतर झाल्यावर मग भारतातील विविध भागांमध्ये हे पुन्हा प्रवास करतात. अगदी उत्तर-मध्य महाराष्ट्रातील मैदानी भागांतून त्यांचे स्थलांतर बघावयास मिळते. मार्च महिन्याच्या अखेरीस ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकीस्तान, तुर्कमेनिस्तान, अरमानिया, बल्गेरिया आदी भागांतून पुन्हा आपल्या मायदेशी मूळ निवासी प्रदेशात विणीसाठी जातात. गेली काही वर्षे मी त्यांच्या सर्वेक्षणासाठी गुजरात छोटा रण ऑफ कच्छ, भुज, ग्रेटर रण आाफ कच्छ उत्तर प्रदेश आदी भागांत प्रवास केला.
राजस्थानमधील जोधपूरपासून दीडशे किलोमीटर जैसलमेर रोडवर फलोद तालुक्यातून खिचान गावाकडे पोहोचलो. बऱयापैकी गजबजलेल्या या गावामध्ये अगदी मधोमध एक मोठा तलाव या पक्ष्यांसाठी बांधला आहे. बाजूला एक मंदिर आहे. इथे जैन धर्मीय आणि इतर गावकऱयांनी या पक्ष्यांना खाद्य देण्याची व्यवस्था केली. शिवाय संरक्षण दिले. वस्तीच्या ठिकाणी एक भलीमोठी जागा मोकळी ठेवून त्या ठिकाणी पक्ष्यांना खायला दिले जाते. पूर्व रशिया कामचतका मंगोलिया ते पूर्व चीन येथून हे पक्षी 2400 ते 2800 किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थानमध्ये खिचान गावात पोहोचतात. एकदा का यांची स्थलांतराची रांग गावात सुरू झाली की, बघता बघता आठ-दहा दिवसांत 20 हजारांपर्यंत पक्षी इथे दाखल होतात.
रतनलाल मालू या पक्षीप्रेमी स्थानिक माणसाने गावामध्ये पहिल्यांदा अगदी सत्तर वर्षांपूर्वी या पक्ष्यांना धान्य खायला घालणे चालू केले. आजमितीस वीस हजारांवर हे करकोचे परदेशातून याच गावात येतात. या वर्षी त्यांना बघण्यासाठी ‘महाड‘ माझ्या गावातून योगेश गुरव आणि प्रतीक देसाई हे दोघे पक्षी अभ्यासक जवळपास महिनाभर या गावाच्या परिसरात राहून या पक्ष्यांच्या नोंदी करीत आहेत. या गावांमध्ये भिंतीवर किंवा प्रेक्षणीय ठिकाणी पक्ष्यांची सुंदर चित्रे पारंपरिक पद्धतीने काढलेली बघायला मिळतात. गावात येणारे पक्षी घरच्यांसारखेच पाहुणे म्हणून इथले स्थानिक लोक त्यांचे स्वागत करतात. त्यांची काळजी घेतात, त्यांना खाद्य देतात. हजारो पर्यटक, अभ्यासक त्यांना बघण्यासाठी या गावात येतात. त्यामुळे निसर्ग पक्षी पर्यटन (पक्षी चुग्गा घर) म्हणूनदेखील हे गाव नकाशावर प्रसिद्धीस आले.
या वर्षी विशेष आकर्षण ठरलेला ‘सुकपाक’ नावाचा रशियातील करकोचा. मध्य-दक्षिण रशिया येथील तुवा प्रांतात निवासी असलेला हा पक्षी स्थलांतर करून भारतात पोहोचला. शास्त्राrय संशोधक म्हणून काम करणाऱया ‘एलिना म्युद्रिक’ हिने या पक्ष्याच्या पायात निळ्या आणि पिवळ्या रंगाची रिंग दिनांक 20 जुलैला घातली. तो तेव्हा घरटय़ात थोडा मोठा पूर्ण वाढ झालेला पक्षी होता. पुढे राजस्थानच्या खिचान गावात हा पक्षी पोहोचला आणि इथे त्याचा फोटो ‘क्यारोलीन सिनेट’ या ऑस्ट्रेलियन पर्यटकाने काढला. 27 नोव्हेंबर 2024 ला प्रोफेसर ‘दाऊलाल बोहरा’ यांनी त्याची स्थलांतराची सर्व सविस्तर माहिती संकलित करून प्रसिद्धी केली. या पक्ष्याने एक वेगळा विक्रम नोंदवला. तो म्हणजे हा पठ्ठय़ा परतीच्या प्रवासाचा उलट मार्ग निश्चित करून भारतात 3676 कि.मी. प्रवास करीत दाखल झाला.
या संशोधनावरून असा निष्कर्ष निघतो की, आपल्या ठरलेल्या मार्गावरून भारतात येणारे काही कांडे करकोचे हे वेगळा मार्गदेखील निवडतात. जसे या ‘सुकपाक’ करकोच्याने दक्षिण मध्य आखाती प्रदेशातून पाकिस्तानमार्गे गुजरात आणि मग राजस्थान असा मार्ग निवडला. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उलट स्थलांतराचे हे उदाहरण शास्त्राrयदृष्टय़ा अचंबित करणारे आहे. कारण खरे तर तो रशिया इथून नेपाळ आणि मग हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशातून भारतात 2600 ते 2800 कि.मी. प्रवास करून येणे अपेक्षित होते. म्हणजे त्याला लागणारी ऊर्जा आणि इतर बाबी या पारंपरिक स्थलांतराच्या चौकटीत बसणाऱया आहेत, पण 3700 कि.मी. इतका लांब पल्ल्याच्या खडतर प्रवास त्याने का निवडला हे आश्चर्यच आहे.
निसर्गात निर्माण होणारे तापमानाचे बदल, ज्वालामुखी, वणवा, हवेचा दाब, वादळी वारे, उपलब्ध संरक्षित वन, माळरान आणि खाद्य या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून नियोजित ठिकाणी पोहोचणे हे नव्या पक्षी पिढीसाठी आव्हानात्मक आहे हे निश्चित.
(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)