वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली लागणार, म्हाडात मंगळवारी लोकशाही दिन

म्हाडातर्फे दहावा लोकशाही दिन मंगळवार 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिन होणार आहे. त्यामुळे रहिवाशांना आपल्या तक्रारी थेट उपाध्यक्षांपुढे मांडता येणार आहेत.

म्हाडा मुख्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. आतापर्यंत म्हाडामध्ये नऊ लोकशाही दिन झाले आहेत. या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली निघाली आहेत. याशिवाय म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पहिल्या जनता दरबार दिनाचे बुधवारी 16 एप्रिल रोजी आयोजन केले आहे. कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील गुलजारीलाल नंदा सभागृहात हा जनता दरबार होणार आहे.