सलमान खानकडे 10 कोटींची खंडणी मागणारा अटकेत

बॉलीवूड अभिनेता सलमान खानकडे 10 कोटींची खंडणी मागणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहमद तय्यब अली असे त्याचे नाव आहे. तो व्यवसायाने सुतार आहे. मोहमदला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून खंडणीच्या धमकीसाठी मेसेज आणि फोन येत असल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक मेसेज आला. मेसेज करणाऱ्याने गुंड लॉरेन्स बिष्णोईचे नाव त्यात नमूद केले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास 10 कोटी रुपये खंडणी स्वरूपात द्यावे लागतील असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलीस नियंत्रण कक्षाने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली.

परिमंडळ -9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेदाम यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रौफ शेख यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशच्या बरेली येथे गेले आणि मोहमदच्या मुसक्या आवळल्या.

यूट्यूबवर व्हिडीओ पहायचा
मोहमद हा गेल्या काही दिवसांपासून सलमानबाबत यूटय़ूबवर व्हिडीओ आणि गुगलवर वारंवार माहिती सर्च करत असायचा. स्वतःचा टाइमपास करण्यासाठी त्याने मोबाईलवरून धमकीचा मेसेज पाठवल्याचे समोर आले.