
पैशांअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने संबंधित महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही रुग्णालयाची मोठी चूक आहे, असा ठपका आरोग्य समितीने ठेवला आहे. रुग्णालयानेही दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखालील समिती शनिवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलला भेट देऊन चौकशी केली होती. समितीने रुग्णाशी संबंधित सगळी कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आणि संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला. नार्ंसग होम अॅक्टमधील नियमानुसार आपत्कालीन स्थितीत रुग्णालयाला रुग्णाकडे अनामत रक्कम मागता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाकडून या नियमाचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जात आहे.
चौकशी समितीपुढे रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पतीला दूरध्वनी केला होता, असा दावा रुग्णालयाने केला आहे. त्याची खातरजमा समिती करीत असून, याप्रकरणी रुग्णालयाकडे समितीने पुरावा मागितला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या माता मृत्यू समितीची बैठक आज झाली. या बैठकीत गर्भवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर चर्चा करण्यात आली. समितीने सर्व बाजूंनी चौकशी केली असून यामध्ये भिसे कुटुंबीयांचेदेखील म्हणणे घेण्यात आले आहे.
चौकशी समितीची कुटुंबियांशी चर्चा
मंगेशकर रुग्णालयाने मृत गर्भवतीच्या आजारांबाबतची माहिती सार्वजनिक करायला नको होती. त्यामुळे खासगी माहिती सार्वजनिक केल्याने रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी मृत गर्भवतीच्या कुटुंबियांनी आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडे केली आहे. या समितीच्या सदस्यांनी मृत महिलेच्या घरी जाऊन कुटुंबियांशी दीड तास चर्चा केली. एक ते दोन दिवसांत कुटुंबिय लिखित स्वरूपात म्हणणे सादर करणार असून, त्यानंतर अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. दीनानाथ रुग्णालयाने गर्भवतीला दाखल करण्यासाठी तो ‘गोल्डन अवर’ होता का? दाखल केले असते तर तिचा जीव वाचला असता का, याचा शोध समितीतर्फे घेण्यात येत आहे.