
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज महायुती सरकारवर जोरदार टीका करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. नांदेड जिह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. त्या आत्महत्येवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.
शेतमालाला भाव नाही, पीक विम्याची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ असून नांदेडमधील शेतकऱ्याची आत्महत्या नसून तो सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी आहे, अशा शब्दांत सपकाळ यांनी सरकारचा समाचार केला.
जयंत पाटील यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून फडणवीस सरकारचा समाचार घेतला. नांदेडचे शेतकरी बोंबले यांनी गळफास घेतला, तर गव्हाचे बियाणे बोगस निघाल्याने जालनात शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पीक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे, असा सवाल पाटील यांनी या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.