बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे, असे याचिकाकर्ते इखलास उद्दीन भुईयाँ यांनी म्हटले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट 2006 अंतर्गत हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय, बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगाला याचिकेत प्रतिवादी करण्यात आले. या अर्जावरील सुनावणी बांगलादेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे.

दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुणांवर होत असल्याचे म्हटलंय.