सरपंचांवर हल्ला झाल्यास 353 अंतर्गत गुन्हा दाखल करा, मुंबईतील आझाद मैदानात भरलेल्या सरपंच परिषदेत मागणी

सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर गुंडांकडून हल्ला झाला तर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील सरपंचांनी आज केली. सरपंच परिषदेच्या नेतृत्वाखाली सरपंच आणि उपसंरपंचांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा यावेळी सरपंच परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या हत्या प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल करा, देशमुख कुटुंबीयांना संरक्षण पुरवा, संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी द्या आणि 50 लाखांची मदत द्या, अशा मागण्या यावेळी सरपंच परिषदेने केल्या. संतोष देशमुख यांचे कटआऊट्स आणि मागण्यांचे फलक यावेळी सरपंचांनी हाती घेतले होते.

संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा, त्यांचा तेरे नाममधील सलमान झाला पाहिजे – सुरेश धस

बीडमधील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा, त्यांना बिनभाडय़ाच्या खोलीत पाठवा, नातेवाईकांसह कुणालाही त्यांना भेटू देऊ नका, ‘तेरे नाम’मधल्या सलमान खानसारखी त्यांची अवस्था झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. आझाद मैदानात सरपंच परिषदेच्या आंदोलनात धस सहभागी झाले होते. ही केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. एका दलित वॉचमनना मारू नका सांगायला गेला, खंडणी घेऊ नका म्हणाला म्हणून संतोष देशमुखचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या मारहाणीचे शूटिंग करण्यात आले. व्हिडीओ कॉल करून आकाला दाखवण्यात आले. चित्रीकरण करण्यात आले, व्हिडीओ कॉल करण्यात आला. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. मध्येच सेलिब्रेटी आणण्यात आल्या आणि इतरही प्रकार करण्यात आले, असे सांगतानाच काहीही झाले तरी या प्रकरणावरून आपले लक्ष हटू देऊ नका, असे आवाहन सुरेश धस यांनी सरपंचांना केले.