मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. या खात्यात सुमारे 35 हजार कर्मचारी काम करतात, मात्र कामाचे व कामगारांचे दैनंदिन नियोजनाचे काम करणाऱया पर्यवेक्षकीय अधिकाऱयांची 96 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत पर्यवेक्षकांची दमछाक होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तत्काळ भरून हे खाते पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे.
मुंबई महापालिकेत घनकचरा विभाग हा अत्यावश्यक सेवेत येतो. या विभागात सुमारे 35 हजार कामगार-कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईतील शहर व उपनगरांतील 24 वॉर्डातील कचरा संकलन करून तो डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याचे काम या कामगारांकडून केले जाते. या विभागात सर्व वॉर्डातील घनकचरा व्य़वस्थापनाचे नियोजन करण्याचे काम पर्यवेक्षकीय अधिकाऱयांकडून केले जाते. पर्यवेक्षीय संवर्गात एकूण 423 पदांपैकी मुख्य पर्यवेक्षकांसह 96 पदे रिक्त आहेत. यात उपमुख्य पर्यवेक्षक 6 तर कनिष्ठ पर्यवेक्षकांची 65 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे पालिकेच्या 24 वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करताना कार्यरत पर्यवेक्षकीय कर्मचाऱयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. त्यामुळे ही रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अशी आहेत रिक्त पदे
पद एकूण पदे कार्यरत रिक्त पदे
मुख्य पर्यकेक्षक 1 0 1
उपमुख्य पर्यकेक्षक 8 2 6
सहाय्यक मुख्य पर्यकेक्षक 31 19 12
पर्यकेक्षक 65 53 12
कनिष्ठ पर्यकेक्षक 423 358 65