पेन्शन रिव्हिजनची मागणी; नगरमध्ये बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

पेन्शन रिव्हिजन मागणीसाठी मंगळवारी जॉईन्ट फोरम ऑफ बीएसएनएल व एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. पेन्शन रिव्हिजनसह विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात आप्पासाहेब गागरे, आप्पासाहेब गागरे, शिवाजी थोरात, दत्तात्रय भालेराव, भानुदास महानूर, सुधाकर पवार, दत्तात्रय भोर, विलास कोकरे, लालाजी शेख, शिवाजी मोढवे, राजू कोकरे आदींसह जिल्ह्यातील बीएसएनएल कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुरुवातीला द्वार सभा होऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न मांडले. पेन्शन रिव्हिजन 1 जानेवारी 2017 पासून मिळण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. केंद्र सरकारने हा प्रलंबित विषय लवकरात लवकर सोडवण्याची मागणी बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नगर बीएसएनएलच्या मुख्यालयात जनरल मॅनेजर यांना देण्यात आले.