महाविकास आघाडीचा कायदा महिलांना संरक्षण देणारा, शिव विधी व न्याय सेनेच्या शिबिरात ‘शक्ती’ कायद्याचा आग्रह

शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या महिलांचे हक्क आणि कायदे या विषयावरील शिबिरात महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची जोरदार मागणी करण्यात आली.

महिला अत्याचार प्रकरणांमध्ये 21 दिवसांत आरोपपत्र, बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करणे, ऑसिड हल्ले, सोशल मिडिया, ईमेल मेसेजवर महिलांची बदनामी व छळ केल्यास कठोर कारवाईची तरतूद असणारं ‘शक्ती’ विधेयक महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणण्यात आलं होतं. या कायद्याची अंमलबजावणी होण्याची सध्या नितांत गरज आहे, असे मत यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना विवाह, संपत्तीबाबतीत समान अधिकार देण्यात आले आहेत. स्त्रीयांनी स्वतःच्या हक्कांबाबतीत जागरूक राहावे आणि अत्याचारांना तोंड देण्यासाठी सक्षम होण्याची गरज आहे, असे शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितले. शिव विधी व न्याय सेनेच्या वकील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या विविध शाखा, तालुका, जिह्यांमध्ये जाऊन गरजू महिलांना आवश्यक कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करावे, असे उपनेत्या विशाखा राऊत म्हणाल्या. शिबिराला माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला आघाडीच्या रंजना नेवाळकर, विभाग संघटिका पद्मावती शिंदे उपस्थित होत्या.

अध्यक्षस्थानी संघटनेच्या उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड होत्या. त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना संबधित फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली. तर कोकण-गोवा सचिव अॅड. स्वप्ना कोदे यांनी सायबर गुन्हे, हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, डेटाचा गैरवापर याबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनावणे, चिटणीस सुमीत घाग, ज्ञानेश्वर कवळे, मुख्य समन्वयक भूषण मेंगडे, दर्शना जोगदनकर, सोनाली मयेकर, कोजल कदम, विदर्भ अध्यक्ष वर्षा जगताप, शीतल मोहिले, सुषमा थोरात, रेश्मा ठिकार, धनराज कांबळे, विकास गोरडे यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन भक्ती दांडेकर यांनी केले.