ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मोमोजची डिलिव्हरी न केल्यामुळे कर्नाटकच्या ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला दणका दिला. झोमॅटोने धारवाडच्या महिलेला 60 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
धारवाडच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 3 जुलै 2004 रोजी हा आदेश दिला. शीतल नावाच्या महिलेने 31 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटोवरून मोमोची ऑर्डर दिली आणि गुगल पे करून 133 रुपयांचे पेमेंट केले. ऑर्डर केल्यानंतर 15 मिनिटांनी तिला मेसेज आला की, तुमची ऑर्डर डिलिव्हर झाली आहे. त्यानंतर त्या महिलेला मोमोज काही मिळाले नाहीत. कुणीही झोमॅटोचा प्रतिनिधी तिच्याकडे आला नाही. महिलेने रेस्टॉरंटमध्ये फोन करून चौकशी केली, तेव्हा डिलिव्हरी एजंट ऑर्डर घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. वेबसाईटवर विचारले असता एजंटकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर शीतलने झोमॅटोकडे तक्रार केली. झोमॅटोने त्यांना उत्तरासाठी 72 तास वाट पाहण्यास सांगितले. त्यानंतरही काही उत्तर न मिळाल्याने शीतलने 13 सप्टेंबर 2023 रोजी झोमॅटोला कायदेशीर नोटीस पाठवली.
नोटिसीला उत्तर देताना झोमॅटोच्या वकिलांनी आरोप फेटाळले आणि महिलेला खोटे ठरवले. शीतलने कोर्टात पुरावे सादर केले. या वर्षी मे महिन्यात झोमॅटोने शीतलला 133 रुपये परत दिले. मात्र झोमॅटोच्या चुकीमुळे शीतलला मानसिक त्रास झाला असून पंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे आयोगाने म्हटले. ग्राहकाची गैरसोय व मानसिक त्रास झाल्याबद्दल 50 हजार भरपाई, 10 हजार खटल्याचा खर्च असे एकूण 60 हजारांचा दंड झोमॅटोला बसला.