Delhi Election 2025 – गुंडगिरी हरेल, दिल्ली जिंकेल; अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला विश्वास

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीत आप, काँग्रेस व भाजप असा तिरंगी सामना होत आहे. विधानसभेच्या 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील सत्ता टिकवण्यासाठी आम आदमी पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. यासाठी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकर जनतेला साकडे घातले आहे. आज आपल्याला खोटेपणा, द्वेष आणि भिती च्या राजकारणाला हरवायचं आहे, असे आवाहन केजरीवाल यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत दिल्लीकरांना केले आहे.

काय म्हणाले केजरीवाल?

प्रिय दिल्लीकरांनो, आज मतदानाचा दिवस आहे. तुमचे मत हे फक्त एक बटण नाही तर ते तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. चांगल्या शाळा, उत्तम रुग्णालये आणि प्रत्येक कुटुंबाला सन्माननीय जीवन जगण्याची संधी आहे. आज आपल्याला खोटेपणा, द्वेष आणि भीतीच्या राजकारणाला पराभूत करत सत्य, विकास आणि प्रामाणिकपणाचा विजय करायचा आहे. स्वतः मतदान करा आणि तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि शेजाऱ्यांनाही प्रेरित करा. गुंडगिरी हरेल, दिल्ली जिंकेल, असे केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.