टॉपरचे नाव गुप्त ठेवणारे दिल्ली विद्यापीठ पहिलेच! मोदींच्या डिग्रीत दडलंय काय? व्यंगचित्रकार मंजुल यांचे फटकारे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी फक्त न्यायालयालाच दाखवू, त्रयस्थ व्यक्तीला नाही, अशी भूमिका दिल्ली विद्यापीठाने दिल्ली हायकोर्टातील सुनावणीदरम्यान मांडली. सोशल मीडियात यावरून ‘मोदींच्या डिग्रीत दडलंय काय?’ अशी जोरदार चर्चा सुरू असून प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल यांनी टॉपरचे नाव गुप्त ठेवणारे दिल्ली विद्यापीठ जगातील पहिलेच, असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठाचे टॉपर असून त्यांनी 1978 मध्ये बीएची पदवी घेतल्याचे सांगितले जाते, मात्र त्यांच्या पदवीसंदर्भातील कागदपत्र जाहीर करण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. आम्ही पंतप्रधानांची पदवी न्यायालयालाच दाखवू. राजकीय हेतूने पदवी दाखवण्याची मागणी करणाऱ्यांना ती दाखवणार नाही, असे दिल्ली विद्यापीठाच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. मोदी यांची पदवी सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निकाल दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. सचिन दत्ता यांनी राखून ठेवला आहे.

नेमके प्रकरण काय?

नीरज शर्मा नामक व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती माहिती अधिकारात मागवली होती. केंद्रीय माहिती आयोगाने  21 डिसेंबर 2016 रोजी ही माहिती अर्जदाराला देण्याचे निर्देश दिले. विद्यापीठाच्या मागणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2017 रोजी केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.