Delhi Stampede – रेल्वेस्थानकातील गर्दी पाहून ते घरी परत निघाले, पण मुलीचा हात सुटला अन् अनर्थ घडला

दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 वर्षाच्या रियाचाही समावेश आहे. ओपल सिंग हे प्रयागराजला जाण्यासाठी स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी आले. मात्र रेल्वे स्थानकावरील परिस्थिती पाहून सिंग यांनी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वडिलांच्या हातातून रियाचा हात सुटला आणि अनर्थ घडला. चेंगराचेगरीत रियाला आपला जीव गमवावा लागला.

काय घडलं नेमकं?

ओपल सिंग आपली पत्नी, दोन मुली आणि दोन भावांसोबत प्रयागराजला जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचले. सिंग यांचा आधी शिवगंगा एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न होता. मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे ते मगध एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न होता. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरील गर्दी पाहता सिंग यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. स्टेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची धाकटी मुलगी रियाचा हात सुटला आणि ती गर्दीत अडकली.

पायऱ्या चढायला सुरवात करताच अचानक हजारो लोक वरून खाली आले आणि सामानासह एकमेकांवर पडले. या गर्दीतून सिंग यांची पत्नी, मोठी मुलगी आणि दोन भाऊ कसेतरी बाहेर पडले. मात्र छोटी मुलगी रिया लोखंडी रेलिंगवर अडकली. यावेळी तिच्या डोक्यात खिळा घुसला. यात गंभीर जखमी झालेल्या रियाचा मृत्यू झाला.

समान नावांच्या गाड्यांच्या घोषणेमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्म बदलला आहे असा समज झाल्याने प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी धावाधाव झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली, असे प्राथमिक तपासात दिसून आले.