Delhi Stampede – चेंगराचेंगरीनंतर तब्बल 40 मिनिटांनी आपत्कालीन कॉल, आरपीएफच्या अहवालात धक्कादायक खुलासा

कुंभस्नानासाठी चाललेल्या भाविकांमध्ये 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यात 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ)ने अहवाल सादर केला आहे. या अहवालात आरपीएफने धक्कादायक खुलासा केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन कॉल तब्बल 40 मिनिटांनी करण्यात आल्याचे अहवालातून समोर आले आहे.

चेंगराचेंगरीबाबत रेल्वे, अग्निशमन अधिकारी आणि दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या वेळेत तफावत आहे. रेल्वेने त्यांच्या अधिकृत पत्रात दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.15 वाजता चेंगराचेंगरी झाली. तर दिल्ली अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.55 वाजता पहिला कॉल आला.

आरपीएफच्या हवाल्याने इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री 8.48 वाजता चेंगराचेंगरी झाली आणि कर्तव्यावर असलेल्या स्टेशन प्रभारींना याची माहिती देण्यात आली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.