भाजपचे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रमेश बिधुडी यांची जीभ आज दिल्लीतील एका सभेत भाषण करताना घसरली. दिल्लीतील रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालाप्रमाणे तयार करून दाखवणार, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी ‘एक्स’वरून शेअर केल्यानंतर बिधुडी यांनी याप्रकरणी जर माझ्या विधानामुळे कुणी दुखावले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असे सांगत सारवासारव केली.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी बिधुडी यांचा व्हिडीओ ‘एक्स’वरून शेअर करत प्रचंड संताप व्यक्त केला. अशा प्रकारे गैरवर्तन केवळ अशा नीच माणसांकडूनच होऊ शकते. त्यांच्या या विधानातून त्यांचीच नाही तर त्यांच्या वरिष्ठांचीही मानसिकता दिसते, अशा शब्दांत खेडा यांनी संताप व्यक्त केला. या महिलाविरोधी भाषेचे जनक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. मंगळसूत्र आणि मुजरा यांसारखे शब्द त्यांनीच वापरले होते, याची आठवण काँग्रेस प्रवक्त्या सुपिऱया श्रीनेत यांनी ‘एक्स’वरून करून दिली.