नवी मुंबईत दिल्ली पब्लिक स्कूलच्या बसचालकाचा चिमुरड्यावर अत्याचार; शिवसेनेने विचाराला शाळा व्यवस्थापनाला जाब

दिल्ली पब्लिक स्कूलच्या स्कूल बसचालकाने एका चार वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता त्यांनी कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रकार केला. त्यामुळे पालकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूल बसचालकाला अटक केली आहे.

सीवूड येथील दिल्ली पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा नवी मुंबईत एक नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलावर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालक शाळेत गेले आणि त्यांनी मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांच्याकडे तक्रार केली. मात्र वशिष्ठ यांनी कोणतीही दखल न घेता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकांनी थेट एनआरआय पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून नराधम बसचालकाच्या मुसक्या आवळल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आज मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी शाळेत गेले. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने शाळेचे गेट उघडले नाही. गेट तोडून शिवसैनिकांनी शाळेत प्रवेश करून मग्रुर शाळा व्यवस्थापनाचा निषेध केला.

मुख्याध्यापकाला सहआरोपी करा

इतका गंभीर गुन्हा घडल्यानंतरही मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्याकडे केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, संदीप पाटील, शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहरप्रमुख समीर बागवान, संदीप पवार, शिवाजीराव शिंदे, विभागप्रमुख विशाल विचारे, मिलिंद भोईर, तानाजी जाधव, हरीश इंगवले, शाखाप्रमुख राकेश माहुलकर, अरविंद जाधव आदी उपस्थित होते.