दिल्लीत प्रदूषणाने ओलांडलेली धोक्याची पातळी सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे. बारावीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याबद्दल ठोस निर्णय घ्या, तसेच आम्हाला विचारल्याशिवाय स्टेज 3 आणि स्टेज 4 चे निर्बंध अजिबात हटवू नका. हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारण्यासाठी ग्रेडेड रिस्पन्स ऍक्शन प्लॅन स्टेज 3 आणि 4 अंतर्गत प्रतिबंध लागू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारसह हरयाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले.
हवेची गुणवत्ता पातळी 300 एक्यूआयच्या खाली आली म्हणजेच हवा काही प्रमाणात सुधारली तरीही प्रतिबंध हटवू नका, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. दिल्लीसह आसपासच्या राज्यांमध्ये वाढलेल्या प्रदूषणप्रकरणी आज सकाळी न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने हवेची गुणवत्ता इतकी खालावली असताना स्टेज 3 चे प्रतिबंध लागू करण्यास 3 दिवसांचा विलंब का झाला? असा सवाल विचारला.