भरधाव कारनं पोलीस कॉन्स्टेबलला उडवलं; फरफटत नेलं, उपचारांदरम्यान मृत्यू, हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

देशाची राजधानी दिल्लीमध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील नांगलोई भागात रविवारी पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने पोलीस कॉन्स्टेबलला उडवले. यात गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संदीप (वय – 30) असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते सोनीपत येथील रहिवासी होते. नांगलोई येथे एका भाड्याच्या घरामध्ये ते रहात होते. 2018 मध्ये ते पोलिसात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. नांगलोई भागात वाढलेल्या दरोड्याच्या घटनांचा तपास करण्यासाठी संदीप साध्या कपड्यांमध्ये गस्त घालत होते. दुचाकीवरून जात असताना संदीप यांनी बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या कारचालकाचा हटकले. संदीप यांनी चालकाला गाडी हळू चालवण्यास सांगितले. मात्र चालकाने वेग कमी केला नाही.

कारचालकाला थांबवण्यासाठी संदीप यांनी कारला ओव्हरटेक करत दुचाकी समोर नेली. मात्र व्हॅगनाआर कारचालकाने गाडीचा वेग वाढवला आणि दुचीकाला जोराची धडक दिली. यानंतर जवळपास 10 मीटर फरफटत नेले आणि दुसऱ्या कारलाही उडवले. यात संदीप हे गंभीर जखमी झाले. त्यांना आधी सोनिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बालाजी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस उपायुक्त जिमी चिराम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हॅगनाआरमध्ये दोन लोक होते. अपघातानंतर दोघेही कार घटनास्थळी सोडून पळून गेले. पोलिसांनी कार जप्त केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पुढील तपास सुरू आहे.