मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक; जाणून घ्या कारण…

महाकुंभ मेळ्यात प्रसिद्धी मिळालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मोनालिसाला ही ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सनोज मिश्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सनोज मिश्रावर हिरोईन होण्याचं आमिष दाखवत एका मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सनोज मिश्राचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सनोज मिश्रावर एका छोट्या शहरातून आलेल्या आणि हिरोईन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये टिकटॉक आणि इन्स्टाग्रामद्वारे तिची मिश्राशी ओळख झाली. त्यानंतर दिग्दर्शकाने तिला झाशी रेल्वे स्थानकात बोलवून तिची भेट घेतली. यावेळी त्याने तिला चित्रपटात हिरोईन करण्याचे आमिष दाखवले. दुसऱ्या दिवशी मिश्राने तिला एका रिसॉर्टमध्ये नेलं आणि अमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवले आणि विरोध केल्यास ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. मिश्राने चित्रपटात काम देण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी मिश्राला अटक झाली आहे.