दिल्लीत भरधाव कारने पाच जणांना चिरडले, जखमींमध्ये एका बालकाचा समावेश

दिल्लीत एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारने एका बालकासह पाच जणांना चिरडले. सुदैवाने या अपघातात चौघांना किरकोळ जखम झाली असून चिमुकला कारखाली अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. तसेच अपघातग्रस्त कारही जप्त केली आहे.

अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगरमधील एका चहाच्या दुकानात चार-पाच लोकं चहा पित होते. तेथेच एक लहान मुलगाही होता. इतक्यात एक भरधाव सेंट्रो कार अनियंत्रित झाली आणि या सर्वांना धडकली. कारने धडक देताच सर्वजण हवेत फेकले जाऊन जमिनीवर आदळले. तर लहान मुलगा कारखाली अडकला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी चिमुकल्याला कारखालून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. संतापलेल्या जमावाने चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केला.