
पैशासाठी माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. दिल्लीत अशीच एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एक कोटीच्या विम्यासाठी एका पित्याने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बनाव केला. सर्व प्लाननुसार झालं. मात्र कायद्याला कुणी फसवू शकत नाही असं म्हणतात. अन् पोलिसांनी सूतावरून स्वर्ग गाठत अखेर बाप-लेकाचा कारनामा उघड केला. फसवणूक प्रकरणी बाप-लेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याने आधी आपल्या मुलाच्या नावे एक कोटी रुपयांचा विमा घेतला. यानंतर एका बनानट अपघाताचा कट रचला. कथित अपघात नजफगडमध्ये 5 मार्च रोजी झाला आणि यात त्याला किरकोळ जखम झाली. तो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यानंतर त्याला मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. प्रत्यक्षात तो कोणत्याही रुग्णालयात गेला नाही.
काही दिवसांनी पित्याने सर्वांना मुलाचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार केल्याचेही सांगितले. तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून मुलाचं तेरावंही केलं. यानंतर विम्याच्या रकमेसाठी दावा केला. सर्व काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं. मात्र पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली आणि तपासात सर्व भांडाफोड झाला.
11 मार्च रोजी एक व्यक्ती पोलिसांकडे गेला आणि त्याने आपल्या हातून अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच अपघात झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला. तपासादरम्यान कोणताही अपघात आणि कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच गगन नामक तरुणाच्या अपघाती मृत्यूचा दावा करण्यात येत असून त्याने काही महिन्यांपूर्वी एक कोटीचा विमा काढल्याचेही तपासात उघड झाले.
पोलिसांना शंका आल्याने पोलिसांनी या अपघात प्रकरणाचा सखोल तपास केला असता सर्व प्रकरण उघडकीस आले. गगन आणि त्याच्या वडिलांनी एका वकिलाच्या सल्ल्यानुसार ही सर्व कट रचल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली. या प्रकरणातील वकिलाच्या भूमिकेबाबत तपास सुरु आहे.