दिल्लीतील डझनभर शाळांमध्ये बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी बारावीच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याने हा कारनामा केल्याचे उघड झाले आहे.
सदर विद्यार्थ्याला परीक्षेला बसायचे नव्हते. त्यामुळे त्याने परीक्षा टाळण्यासाठी हे कृत्य केले. असे केल्यास परीक्षेत व्यत्यय येईल आणि परीक्षा रद्द होईल असा त्याचा समज होता. यासाठी त्याने किमान सहा वेळा शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे मेल पाठवले होते. एकदा त्याने 23 शाळांना मेल पाठवला होता.
पोलीस मुलाची सखोल चौकशी करत आहेत. त्याने हे कृत्य स्वतःच्या मर्जीने केले होते की कुणाच्या सांगण्यावरून याबाबतही पोलीस तपास करत आहेत.