दिल्लीत प्रदूषणानंतर आता डेंग्यूने अक्षरशः कहर केला असून डेंग्यूशी लढण्यासाठी दिल्ली महापालिकेने आतापर्यंत तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी पालिकेने 100 कोटी रुपयांची तरतूद केली. तर गेल्या आर्थिक वर्षात पालिकेने 87.99 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आरटीआयमधून मिळाली आहे. दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
दिल्ली महापालिकेने 2024 साठी 96.79 कोटी रुपये खर्च केले. यात धूम्रफवारणीसाठी 4.8 कोटी रुपये, डेंग्यूला कारणीभूत ठरणाया डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी 83.25 लाख रुपये, औषधे आणि इतर साहित्य खरेदीसाठी 42.02 लाख रुपये, विशेष मोहीम राबवण्यासाठी 1.2 लाख रुपये, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 17.05 लाख रुपये तर जाहिरातींपोटी 2.20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घरांमध्ये डेंग्युला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी दिल्लीकर उपाययोजना करत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी म्हणजेच तपासणीसाठी 2.89 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2023 मध्ये हाच आकडा 4.14 कोटी रुपये इतका होता.
गेल्या वर्षी धूरफवारणीसाठी 4.18 कोटी, डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी 9.56 कोटी, औषधे आणि इतर साहित्य खरेदीसाठी 90 लाख रुपये, विशेष मोहीम राबवण्यासाठी 1.2 लाख रुपये, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 2 लाख रुपये तर जाहिरातींपोटी 2.09 लाख रुपये खर्च करण्यात आले होते.