
दिल्ली येथे शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरुण, नवोदितांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळतेय. याच प्रयत्नांतून दोन विशेष गीतांची निर्मिती करण्यात आलीय. ‘हे मराठी बाहू’ आणि ‘आम्ही असू अभिजात’ अशी ही गीतं असून त्यांना रसिकांना चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील ‘आम्ही असू अभिजात’ या गीताचा व्हिडीओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला असून मराठी संगीत क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
दिल्लीत होणारे 98 वे साहित्य संमेलन अवघ्या तीन दिवसांवर आलेय. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मागील अनेक दिवस संमेलनाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती केली जातेय. विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन गीतांची निर्मिती करण्यात आलीय. ‘आम्ही असू अभिजात’ या गीताचे प्रकाशन सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. ‘आम्ही असू अभिजात’चे गीतकार डॉ. अमोल देवळेकर तर संगीतकार आनंदी विकास आहेत. हे गाणे गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे, सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी गायले आहे.
‘आम्ही असू अभिजात’ या गाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून व्हिडीओ तयार करण्याची संकल्पना डॉ. अमोल देवळेकर यांची आहे. नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये दहा अंतऱ्याच्या दीर्घकाव्यातून मराठीच्या अभिजात दर्जाचा गौरव करण्यात आलाय. यातून शौर्य, संस्कृती, लोकगीतांचे दर्शन घडते, असे संगीतकार आनंदी विकास म्हणाल्या.