Medha Patkar Arrest – सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, नेमकं प्रकरण काय?

दिल्लीचे नायब राज्यपाल  व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आजच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याआधी बुधवारी साकेत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

काय आहे प्रकरण?

नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक मेधा पाटकर यांनी 25 नोव्हेंबर 2000 रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. देशभक्ताचा खरा चेहरा या नावाने हे प्रसिद्धी पत्रक होते. व्ही. के. सक्सेना हे देशभक्त नसून भित्रे आहेत. हवाला रॅकेटमध्ये सक्सेना यांचा हात असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला होता. सक्सेना यांनी 2001 मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात मेधा पाटकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला. 2003 मध्ये दिल्लीच्या साकेत महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा खटला चालला.

दोन दशकांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले.शिक्षेवरील युक्तिवाद 30 मे 2024 रोजी पूर्ण झाला होता. न्यायालयाने पाटकर यांना दोषी ठरवत 1 जुलै 2024 रोजी त्यांना 5 महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात पाटकर यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. यावर सुनावणी पार पडल्यानंतर दिल्लीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 8 एप्रिल रोजी मेधा पाटकर यांना चांगल्या वर्तणुकीची आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची पूर्वअट घातली होती. परंतु मेधा पाटकर या हजर न राहिल्याने दिल्लीतील साकेत न्यायालयाने पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आता शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांनी अटक केली.