Arundhati Roy : 14 वर्षांपूर्वीचं विधान भोवणार, लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर UAPA अंतर्गत खटला चालणार

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी लेखिका अरुंधती रॉय आणि कश्मीर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय कायदा विषयाचे माजी प्रोफेसर डॉ. शेख शौकत हुसैन यांच्यावर 14 वर्षांपूर्वी केलेल्या विधानाच्या आधारावर यूएपीए कलम 45(1) अंतर्गत खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.

दिल्लीच्या कोपर्निकस रोडवरील एलटीजी ऑडिटोरियम येथे 21 ऑक्टोबर 2010 रोजी ‘आझादी द ओन्ली वे’ नावाखाली एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते. याला अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन हे देखील उपस्थित होते. अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान तेढ निर्माण होईल असे आणि कश्मीर हिंदुस्थानचे अविभाज्य अंग नसल्याचे विधान केल्याचा आरोप आहे. या संदर्भात 27 नोव्हेंबर 2010 रोजी सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडित यांनी अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन यांच्यावर एफआयआर दाखल केली होती.

दिल्लीत आयोजित या पत्रकारपरिषदेत फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी, एसएआर गिलानी आणि वरवरा रावही उपस्थित होते. सय्यद अली शाह गिलानी आणि एसएआर गिलानी यांचा मृत्यू झालेला आहे, तर वरवरा राव हे कोरेगाव-भीमा दंगलीतील आरोपी आहेत.

दरम्यान, या पत्रकारपरिषदेतील वादग्रस्त विधानांचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन यांच्याविरोधात भादवि कलम 124ए, 153ए, 153बी, 504, 505 आणि यूएपीए कायदा कलम 13 अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी नायब राज्यपालांकडे मागितली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नायब राज्यपालांनी भादवि कलमांतर्गत आणि आता यूएपीए अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

अरुंधती यांचे विधान काय?

पत्रकारपरिषदेदरम्यान अरुंधती रॉय यांनी अनेक वादग्रस्त विधानं केल्याचा आरोप फिर्यादी सुशील पंडित यांनी केला आहे. कश्मीर कधीही हिंदुस्थानचे अविभाज्य अंग नव्हते. हिंदुस्थानी सशस्त्र जवानांच्या मदतीने त्यावर जबरदस्ती कब्जा केला आहे, असे विधान अरुंधती रॉय यांनी केले होते. या पत्रकार परिषदेची रेकॉर्डिंगही न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे. याच आधारे न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला लेखिका

अरुंधती रॉय या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या पुस्तकाला 1997 मध्ये मानाचा बुकर पुरस्कार मिळाला होता. बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी महिला बनल्या होत्या. तसेच टाइम्स मॅकझिनने 2014 ला अरुंधती रॉय यांचा जगादील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते.