पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायलयाचा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

महाराष्ट्रातील वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायलयाने झटका दिला आहे. फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांगता कोट्यातून फायदा मिळविल्या प्रकरणात पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन दिल्लीच्या उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकरने षडयंड रचून देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवल्याचे न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे आता पूजावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते.

न्यायलयाने पूजाला आधी दिलेल्या अटकेचे संरक्षणही काढून घेतले आहे. ऑगस्ट महिन्यात पूजा खेडकर हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. 31 जुलै रोजी, यूपीएसीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि आयोगाच्या निवडीतून कायमचे वगळले होते. यूपीएसीने तिला नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

पूजाला न्यायालयाने अटकपूर्व जामीनापासून संरक्षण देण्यास नकार देताना तपास यंत्रणेला या प्रकरणातील तपास कसून करण्याचे निर्देश दिले होते. अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला खेडकरने आव्हान दिले होते. न्यायालयाने सांगितले की, याबाबत अधिक संभावना आहे की, पूजाच्या कुटुंबाने तिच्या बनावट कागदपत्रे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यासोबत हातमिळवणी केली. तपासात फेरफार केल्याचा दाखला देत न्यायालयाने म्हटले की याचिकाकर्ता यूपीएससीची फसवणूक करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहे.