त्रिसदस्यीय समिती करणार चौकशी, न्या. वर्मा यांच्या घरी 15 कोटींचे घबाड

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी 15 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. यानंतर वर्मा यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांना सध्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे कोणत्याही खटल्याचे कामकाज देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील तुघलक रस्त्यावरील निवासस्थानी 14 मार्च रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत बेहिशेबी रोख रक्कम आढळली. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मिळाल्यानंतर सरन्यायाधीशांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनू शिवरामन यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती आपल्या चौकशीत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेली रोकड कुठून आली आणि तिचा स्रोत काय आहे याचा तपास करणार आहे.

प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक होणार

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणाशी संबंधित दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तरदेखील सार्वजनिक केले जाईल. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे वेबसाइटवरदेखील उपलब्ध असतील.