दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप नेते आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधूडी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरुन काँग्रेसमधून संताप व्यक्त केला जात असून पवन खेडा यांनी अशाप्रकारची विकृत वक्तव्ये यातून त्या माणसाची मानसिकता दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते असा हल्लाबोल केला आहे.
पवन खेडा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर रमेश बिधूडी यांचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट शेअर करत टीका केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बिधूडी म्हणत आहेत की, लालू म्हणाले होते की, राज्यातील रस्ते हेमामालिनी गालासारखे बनवणार. लालू खोटं बोलले होते. ते बनवू शकले नाही. मात्र मी तुम्हाला आश्वासन देतो की, जसे ओखलाचे रस्ते आम्ही बनवले, संगम विहारचे रस्ते बनवले, अशाचप्रकारे कालकाजीमधील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत बनवू. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून काँग्रेसने यावर संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे पवन खेडा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी लिहीले की, अशाप्रकारची विकृत वक्तव्ये यातून त्या माणसाची मानसिकता दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजप महिलांच्या विरोधात आहे. भाजपचे माजी खासदार आणि आता कालकाजी येथून पक्षाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी प्रियंका गांधींविरोधात केलेले वक्तव्य लज्जास्पद आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी काही बोलतील का? असा थेट सवाल करत महिलाविरोधी भाषेचे आणि विचारसरणीचे जनक खुद्द पंतप्रधान मोदी आहेत, ज्यांनी ‘मंगळसूत्र’, ‘मुजरा’ असे शब्द आपल्या भाषणात वापरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.