दिल्ली पोलीस जनतेला मतदानापासून रोखत आहेत; सौरभ भारद्वाज यांचा गंभीर आरोप

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. जनता मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असल्याने काहीजणांचे धाबे दणादणे आहे. त्यामुळे आता पोलिसांचा वापर करत जनतेला मतदानापासून रोखण्यात येत आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. दिल्लीत अनेक भागात असे प्रकार घडत आहेत. चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

सौरभ भारद्वाज म्हणाले की, मतदानाची संख्या घटवण्यासाठी आणि मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. हे बॅरिकेड्स का लावण्यात आले आहेत? असा सवालही त्यांनी केला. दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्याचे आदेश दिले आहेत? हे सर्व मतदारांना नाहर त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपचा हमखास विजय होणाऱ्या मतदारसंघात हे सर्व उघडपणे सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले की, वयोवृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांची वाहने आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. तरीही सौरभ भारद्वाज ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू, असेही डीसीपी म्हणाले.