Delhi Election 2025 – ‘सपा’नंतर तृणमूल काँग्रेसचाही ‘आप’ला पाठिंबा; केजरीवाल म्हणाले, थँक्यू दीदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय घडामोड घडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदम पार्टीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी ममतादीदींचे आभार मानलेत. ‘चांगल्या आणि वाईट परिस्थितीत कायम आम्हाला साथ आणि आशीर्वाद दिल्याबद्दल दीदीचे आभार’, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांच्या ‘आप’ला मंगळवारी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांचेही आभार मानले.