![voting](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/voting-4-696x447.jpg)
नवी दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले आहेत. तिथेही महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचा आरोप होत आहे. दिल्लीत 4 वर्षात मतदारांची संख्या 4 लाखांनी वाढली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यातही मतदारांची संख्या 4 लाखांनी वाढल्याचे आकडेवारीत दिसत आहे. तर काही मतदारसंघातील अनेक नावे वगळण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही असेच घडले होते. त्यामुळे दिल्लीतही हाच पॅटर्न वापरून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप होत आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीपासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या चार वर्षांत दिल्लीतील नोंदणीकृत मतदारांची एकूण संख्या 4,16,648 ने वाढली, तर मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून फेब्रुवारी 2025 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या फक्त सात महिन्यांत अंदाजे 3,99,362 मतदारांचे नाव यादीत नोंदवण्यात आले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपने मतदार यादीतून नावे जोडण्याच्या आणि वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या कृतीवर अनेक आक्षेप घेतले. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये, पक्षाने आरोप केला की भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मतदार यादीत फेरफार केले जात आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत नोंदणीकृत मतदारांची एकूण संख्या 1,47,97,990 होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 1,52,14,638 आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकीत 1,56,14,000 झाली.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल भाजपच्या परवेश वर्मा यांच्यात लढत झालेल्या मतदारसंघातील परिस्थिती अशी आहे की, 2020 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, या जागेवरील मतदारांची संख्या 39,757 ने कमी झाली. त्यानंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची संख्या 2,209 मतदारांनी वाढली. याचा अर्थ 37,548 मतदारांची घट झाली आहे. याचा अर्थ असा की 2020 मध्ये नवी दिल्लीत मतदान करण्यास पात्र असलेल्या चारपैकी एका व्यक्तीचे 2024 पर्यंत मतदार यादीतून नाव काढून टाकण्यात आले. 2020 च्या निवडणुकीत या जागेवरील विजयाचे अंतर 21,517 होते.
मुंडकामध्ये फेब्रुवारी 2020 ते मे 2024 या चार वर्षांच्या तुलनेत जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 या सात महिन्यांत मतदारांची संख्या जास्त वाढली. 2020-2024 या चार वर्षांत नोंदणीकृत मतदार 14,230 ने वाढले, तर 2024-25 या फक्त सात महिन्यांत ही संख्या 17,549 ने वाढली. याचा अर्थ 31,779 मतदारांची वाढ झाली. 2020 मध्ये आपचे अनिल लाक्रा यांनी ही जागा 19,158 मतांनी जिंकली होती.
बादलीमध्ये 2020-2024 दरम्यान मतदार यादीत 5,684 मतदार वाढले, तर जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान अवघ्या सात महिन्यांत या संख्येच्या दुप्पट म्हणजे 13,145 मतदार वाढले. यामुळे 18,829 मतदारांची भर पडली. 2020 मध्ये आपचे उमेदवार अजेश यादव यांनी ही जागा 29,094 मतांनी जिंकली होती.
शाहदरा येथे नोंदणीकृत मतदारांची संख्या सात महिन्यांत 7,387 ने वाढली, तर 2020-24 दरम्यान चार वर्षांत 4,564 मतदारांची वाढ झाली. आपने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात भाजप कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातील मतदारांची नावे जोडण्यासाठी आणि वगळण्यासाठी खोटे अर्ज केल्याचा आरोप केला होता. 2020 ची निवडणूक या मतदारसंघात आपचे राम निवास गोयल यांनी 5,294 मतांनी जिंकली होती.
अशा प्रकारच्या घटना दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात घडल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.