Delhi Election Result – दिल्लीत भाजपनं चालवला ‘झाडू’, आप विरोधी बाकांवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत कल पाहता भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजप 46, तर आम आदमी पार्टी 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. अंतिम निकाल हाती येण्यास वेळ असला तरी आतापर्यंतचा इतिहास पाहता या आकडेवारीमध्ये फार बदल होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे 27 वर्षांनी दिल्लीच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते आणि शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळाली. मात्र ईव्हीएम उघडताच भाजपच्या जागा वेगाने वाढू लागल्या आणि बघता बघता बहुमताचा आकडाही पार केला.

आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते पिछाडीवर आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत. यापैकी मनिष सिसोदिया यांचा जंगपुरामधून पराभव झाल्याचे वृत्त आहे.