राजधानी दिल्लीत आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दिल्लीत मुख्य लढत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला जनतेचा काwल स्पष्ट होईल. ‘आप’चा विजयरथ रोखण्यासाठी भाजपचे अनेक बडे नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. भाजप गेल्या 25 वर्षांपासून दिल्लीत सत्तेबाहेर आहे. त्यामुळेच त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर 2013 पर्यंत 15 वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱया काँग्रेससाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यांना मागील निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नव्हती.
‘आप’ किमान 55 जागा जिंकेल – केजरीवाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला किमान 55 जागा मिळतील असा दावा पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ‘महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने मतदानाला जाऊन त्यांच्या घरातील पुरुषांना आम आदमी पक्षाला मत देण्यासाठी पटवून दिले तर 60 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात’ असे केजरीवाल यांनी म्हटले.
43.9 टक्के दिल्लीकरांना हवाय बदल
सी वोटरने दिल्लीतील लोकांना सरकार बदलाबाबत प्रश्न केला. 1 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार तब्बल 43.9 टक्के दिल्लीकरांना बदल हवा असल्याचे समोर आले. लोकांमध्ये सरकारच्या कामकाजाबाबत प्रचंड नाराजी आहे. 10.9 टक्के लोकांनी सरकारविरोधात नाराजी आहे, परंतु त्यांना बदल नको असे सांगितले. तर 38.3 टक्के लोकांनी ते नाराजही नाहीत आणि त्यांना बदलही नको, असे सांगितले.