दिल्लीत कोणालाच कायद्याची भीती नाही, भाजपकडून खुलेआम पैशांचे वाटप; पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांचे संरक्षण!

दिल्लीत भाजपचे लोक खुलेआम मतदारांना पैसे वाटत आहेत. निवडणूक आयोग आणि कायद्याची कोणालाच भीती उरली नाही. याउलट पैसे वाटणाऱ्यांनाच पोलिसांचे संरक्षण आहे, असे सांगताना, भाजपचे लोक पैसे, दारू, सोन्याच्या वस्तू आदींचे वाटप पोलिसांच्या उपस्थितीत करत आहेत, असा हल्ला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर चढवला. त्यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर करून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणला.

पैसे वाटणे हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. वाटला जाणारा एवढा पैसा नक्की येतो कुठून? स्थानिक नेत्यांनी करोडो रुपये कसे जमवले? मते विकत घेण्यासाठी त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशातील जनतेची लूट केली आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. दिल्लीत सत्ताधारी आपच्या विजयाचा ‘चौकार’ रोखण्यासाठी भाजपचे बडे नेते राजधानीत तळ ठोकून आहेत.

मत विकत घेणाऱ्याला मत देऊ नका

जनतेला आवाहन करताना केजरीवाल म्हणाले की, मी तुम्हाला विनंती करतो की, भाजपच्या भ्रष्ट लोकांनी वाटलेले पैसे घ्या. त्यांनी लुटलेले हे तुमचेच पैसे आहेत. पैसे घ्या, पण तुमचे मत विकू नका. तुमच्या मताची किंमत साडी, ब्लँकेट किंवा 1100 रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला मतदानाचा अधिकार सहज मिळालेला नाही. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यास कदापि मतदान करू नका.